लातुर जिल्यातील औसा येथे भव्य तक्षशिला बुध्द विहाराचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते लोकार्पण

लातुर दि. 18- महाकारुणीक तथागत भगवान बुध्दांनी विश्वाला शांतीचा महान संदेश दिला. जगाला सर्वप्रथम शांती, अहिंसा, समता, बंधुता या तत्वांची शिकवण भगवान बुध्दांनी दिली. भगवान बुध्दांनी दिलेल्या धम्मानेच जगाला सर्वप्रथम लोकतंत्राची बहुजन हिताय बहुजन सुखाय या मंत्राने ओळख करुन दिली असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. लातुर जिल्हयाती औसा येथे आमदार अभिमन्यु पवार यांच्या प्रयत्नातुन भव्य तक्षशिला बुध्द विहाराचे निर्माण करण्यात आले आहे. 2 एकरच्या परिसरात भव्य तक्षशिला बुध्द विहार उभारण्यात आले आहे. या बुध्द विहाराचे लोकार्पण ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तक्षशिला बुध्दविहाराचे लोकार्पण प्रसंगी औसा येथे भव्य प्रमाणात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ना. रामदास आठवले यांनी आपले विचार मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी स्थानिक आमदार अभिमन्यु पवार प्रमुख अतिथी म्हणून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, माजी आमदार बसवराज पाटील, रिपब्लिकन पक्षाचे बाबासाहेब कांबळे, डी.एम. दाभाडे, ब्रम्हानंद रेड्डी, बौध्द भंते उपगुप्त महाथेरो भदंत पय्यानंद महाथेरो आणि भिख्खु संघ मोठया संख्येत उपस्थित होते. आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते. तसेच बौध्द उपासक आणि आंबेडकरी जनता मोठया प्रमाणात उपस्थित होते. औसा येथे उंच टेकडीवर हे भव्य सुंदर तक्षशीला बुद्धविहार उभारण्यात आले आहे. येथे विपश्यना सेंटर आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १२ फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. या बुद्धविहारसाठी २ कोटींचा खर्च करण्यात आला आहे अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.